शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Wednesday, 14 January 2015

वाचन चळवळीतील पुस्तकयात्री ‘डॉ.बी.बी.चव्हाण ‘





सा-या कोवळ्या जीवांना
अक्षराचा गंध यावा
उजेडाच दान देण्या
झोपडीत सूर्य यावा !!!

      या त्यांच्या ओळीप्रमाणेच त्यांचे कार्यही वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरतपणे सुरु आहे.दक्षिण मुंबईसारख्या विभागाचे शिक्षण निरीक्षक म्हणून काम पाहत असतानाही त्यांनी आपल्यातील वाचक जोपासला आहे.आणि वाचन चळवळीचा शाळांशाळामद्धे प्रसार करण्यासाठी एक चळवळ उभी केली आहे.
     बी.बी.चव्हाण हे त्यांचे नाव. सुलतानपूर ,ता-खुलताबाद,जि-औरंगाबाद या छोट्याश्या खेड्यात त्यांचा जन्म दिनांक १५ जानेवारी १९७२ या दिवशी झाला बी.एस्सी.आणि एम.ए. केल्यानंतर शिक्षक होण्याच्या प्रेरणेने त्यांनी एम.एड. केले तसेच पहिल्याच प्रयत्नात भल्याभल्यांची दांडी उडविणारी ‘सेट’ परीक्षा ते विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.१९९५ ते २००३ या कालावधीत त्यांनी ‘नूतन कन्या विद्यालय ,वाळूंज’ येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य केले.शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी अनेक नवोपक्रम आपल्या शाळेत राबविले त्यामुळे विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी अल्पावधीतच नाव कमावले.परंतु असे असतानाही त्यांना या उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण व्हावे असे वाटत होते.त्यामुळेच त्यांनी २००३ साली बीड जि.प.ची शिक्षण विस्तार अधिकारीपदाची परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवून शिक्षक विस्तार पदी त्यांची नेमणूक झाली.बीड जि.प.अंतर्गत गेवराई पंचायत समितीमाद्धे काम करत असताना त्यांनी अनेक उपक्रम आपल्या बीटमद्धे राबविले.त्यानंतर औरंगाबाद जि.प.मद्धे बदली झाल्यानंतर मात्र त्यांच्या कार्याला आणखी झळाळी आली.एक अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी आपल्यातील साहित्यिक आणि पुस्तकयात्री मरू दिला नाही.आपल्या दर महिन्यातील वेतनातून पाच हजार रुपये वेगळे काढून त्यांची पुस्तके ते खरेदी करतात. त्यांच्या घरात टी.व्ही. नाही तर टी.व्ही.पाहण्याचा वेळ ते वाचनात घालवतात. आपल्या घरातच त्यांचे स्वतः चे समृद्ध असे वाचनालय आहे. त्यामद्धे आजतागायत सुमारे दोन लाख रुपयांची दर्जेदार पुस्तके आहेत आणि अजूनही त्यामद्धे दरमहा पुस्तकांची भर पडतच आहे.
     औरंगाबाद जि.प.मद्धे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणू काम करीत असताना त्यांनी मुख्य भर दिला तो शिक्षकांना समृद्ध करण्यावर. त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षणाचे त्यांनी आयोजन केले.कला,कार्यानुभव.शारीरिक शिक्षण या विषयांचे प्रशिक्षण त्यांनी रंगमंदिरात आयोजित करून स्वतः कलाकार,आणि विविध कला अवगत असणा-या कलाकारांच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले.शाळांचे संगणकीकरण करण्यावर भर दिला.पाठ्यपुस्तकातील कवितांचे ‘ऑडीओ व्हिज्युअल’ रुपांतर करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकापर्यंत ते पोहोचविले. शिक्षकांच्या मोबाईलसाठी शैक्षणिक रिंगटोन तयार करून दिल्या. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमातून त्यांनी पाठ्यपुस्तकात ज्यांचे धडे आणि कविता आहेत अशा कवी व लेखकांची प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी भेट घडवून दिली.
       अनेक उपक्रम राबवीत असताना या उपक्रमांची व्याप्ती आणखी वाढावी असे त्यांना मनोमन वाटत होते.म्हणून त्यांनी सन २०१० मद्धे एम.पी.एस.सी. मार्फत घेतल्या जाणा-या ‘शिक्षण सेवा वर्ग-१ ’ पदाची परीक्षा दिली या परीक्षेत राज्यातून ७ वा क्रमांक मिळवून त्यांची शिक्षणाधिकारी म्हणून मुंबई दक्षिण ‘शिक्षण निरीक्षक ‘पदी नेमणूक झाली.शिक्षणनिरीक्षक म्हणून काम पाहताना त्यांनी संपूर्ण शाळांना संगणकीकरणाद्वारे जोडले.कागदांचा वापर कमी करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आपल्या विभागाचे सर्व काम ‘पेपरलेस’ करणे ही त्यांची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांचा पुस्तकाकडे ओढा वाढविण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये २१ नोव्हेंबर रोजी ‘वाचू आनंदे’ या पुस्तक महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन केले. तर २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरला ग्रंथमहोत्सव-२०१४ चे आयोजन केले.या ग्रंथमहोत्सवामद्धे ग्रंथतुला,काव्यवाचन,ओरिगामी,अक्षर सुलेखन,चित्रकला,लेखक आपल्या भेटीला,ग्रंथदिंडी ,कविसंमेलन,व्याख्यान अशा अनेक कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली.दप्तराविना शाळा सारखे उपक्रम राबविले ज्यायोगे विद्यार्थी आनंदाने शाळेत येतील.या उपक्रमांची यादी वाढतच जाईल.
       श्री.बी.बी.चव्हाण यांनी मुंबईतील झोपडपट्टीमधील मुले व वंचितांची मुले यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळांकडे विशेष लक्ष दिले आहे.त्यामुळेच मुंबईतील रात्रशाळा या विषयावर ते पी.एच.डी. करत आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता B.Sc.,M.A.,M.Ed, SET,DSM,PHD आपल्याला सर्वकाही सांगून जाते.महाराष्ट्र शासनानेही त्यांची उपक्रमशीलता व शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहून २० जुलै रोजी सिंगापूर येथील कार्यप्रणालीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासगटावर त्यांची निवड केली.हा एक प्रकारे त्यांच्या कार्याचा सन्मानच आहे. आपल्या विभागातील सर्व शाळांचे संगणकीकरण करणे व शिक्षकांना समृद्ध करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या ध्येयाचे सार त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हटल्यास
असा नको एकही हात,
जो पाटीला पारखा !
दप्तराचा स्पर्श ,
व्हावा आईसारखा !!!

श्री.बी.बी.चव्हाण यांच्याशी आपण bbchavan.zp@gmail.com या ई-मेलवर संपर्क करू शकता.



-    सोमनाथ वाळके,
आष्टी, जि-बीड
मोबाईल-७५८८५३५७७७ 
ई-मेल –somnathwalke007@gmail.com 
वेबसाईट- www.shikshakkatta.blogspot.in 

No comments:

Post a Comment