शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Wednesday, 15 March 2017

सर मी जात खोडली

"सर मी जात खोडली"

© सोमनाथ वाळके

नवीन वर्षाच्या पहिल्याच शाळेच्या कार्यदिनी वर्गात पाऊल ठेवले, मुलांनी गर्दी करून नववर्षाच्या शुभेच्छा, ग्रीटिंग कार्ड्स दिले. शुभेच्छांच्या या देवघेवीनंतर विद्यार्थी हजेरी हातात घेतली, हजेरी घ्यायला सुरुवात केली. हजेरी क्रमांक 13 पाहताना अचानक लक्ष गेले तर हजेरीचे दोन रकाने निळ्या शाईपेनने खोडलेले. काही लक्षात येईना कोणी केला असावा हा वाह्यातपणा ? थोडेसे मोठ्या आवाजात विचारले ,
"हजेरी कोणी घेतली होती रे?"
"सर,रोहनने"
मी पाहिले रोहन कावराबावरा होऊन आणि थोडासा घाबरलेल्या अवस्थेत माझ्याकडे पाहत होता.
"रोहन, तू हजेरी घेतली होतीस ?" मी विचारले.
"होय सर." रोहन खालच्या आवाजात म्हणाला.
"तुझ्या नावापुढे स्केचपेनने कोणी खाडाखोड केलीय?" मी मोठ्या आवाजात विचारले.
"मीच केली आहे सर." शांत परंतु खंबीर आवाजात रोहनने उत्तर दिले. बहुधा होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची त्याची तयारी असावी.
आता मात्र मला कुतूहल वाटले रोहनने असे का केले असावे ?
"पण तू हे का केलेस बाळ ?" मी शांत आणि कुतुहलमिश्रित स्वरात विचारले.
"सर तुम्हीच नेहमी सांगता की पृथ्वीवर फक्त एकच जात आणि धर्म आहे तो म्हणजे माणूस, प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याशी एक माणूस म्हणून वागले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची किंवा इतरांची जात किंवा धर्म न पाहता काम केले पाहिजे.जगात समानता आणली पाहिजे, स्वतःच्या मनातून जात काढून टाकली पाहिजे ,आणि मग आमची जात आणि धर्म हजेरीवर का लिहिलेले असते ? नीट पहा सर, मी माझा धर्म आणि जात खोडली आहे." रोहन सांगत होता मी ऐकत होतो ,वर्ग आता सर काय म्हणतील याची उत्सुकता ताणून होता.
"रोहन, आय अँम प्राऊड ऑफ यु"
माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणि डोळ्यात अश्रू तरळले,अनेक दिवसांपासून जे पेरत आहे ते उगवायला लागले आहे याचे समाधान मनाला प्रचंड आनंद देऊन गेले.
"रोहन तुझ्या या कृतीने मला झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही, खरंच तुझ्या कृतीतून तू सर्वांना एक वस्तुपाठ घालून दिला आहेस. तुझा शिक्षक असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो" मी भावनिक होऊन बोलत होतो. वर्गात मुलांशी संवाद साधताना पाठयपुस्तकांच्या पलीकडे जाऊन घटनात्मक मूल्यांच्या बाबतीत आमच्या नेहमी वर्गात गप्पा होतात. समानता, धर्मनिरपेक्षता, मानवता, स्वातंत्र्य अशा अनेक मूल्यांची रुजवणूक या गप्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत होत असते. एक वेगळा दृष्टिकोन मुलांत आता रुजू लागलाय. सध्याच्या प्रचंड कलुषित झालेल्या वातावरणात आज घडलेल्या या सुखद प्रसंगाने मनात एक आशेची पालवी रुजविली आणि एक शिक्षक म्हणून मी योग्य मार्गाने जात आहे याची जाणीव निर्माण करून दिली.
रोहनने आज फक्त हजेरीवरूनच नव्हे तर आपल्या मनातून जात खोडून टाकलीये याचे मनाला असणारे समाधान वेगळेच आहे. 2017 सालच्या वर्गातील पहिल्याच दिवशी घडलेला हा प्रसंग आयुष्याच्या पटलावर कोरून राहणार हे नक्की.
    चला अशा अनेक रोहनच्या जाती आणि धर्म त्यांच्या मनातून पुसून टाकण्यासाठी पाऊल टाकुयात. समतेच्या जगासाठी प्रयत्न करूयात.

    ©सोमनाथ वाळके ©
जि.प.कें.प्रा.शाळा पारगाव जोगेश्वरी
        ता-आष्टी, जि-बीड
     📱7588535777
somnathwalke007@gmail.com

No comments:

Post a Comment