'उपक्रम : वेचक-वेधक' -----
हे नाव आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचने २०१०मध्ये प्रकाशित केलेल्या एका पुस्तकाचे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आखलेल्या निवडक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित ४९ लेखांचा हा संग्रह आहे. या उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या शिक्षकांनीच हे लेख लिहिले आहेत. या पुस्तकाच्या १२००० प्रती विकल्या गेल्या आहेत. आता या वर्षी या पुस्तकाची तिसरी (सुधारित) आवृत्ती दिनांक २५ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
या आवृत्तीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून पुढील सहकार्य हवे आहे.
(१) यापूर्वीच्या दोन आवृत्त्यांमध्ये ज्या शिक्षकांचे लेख प्रकाशित झाले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या बदलांसह पुनर्लेखन करून लेख पाठवायचे असतील तर त्यांनी ते अवश्य पाठवावे. (शब्दमर्यादा १८०० शब्द)
(२) ज्या शिक्षकांना या पुस्तकासाठी नव्याने लेख पाठवायचे आहेत, त्यांनीही ते पाठवायला हरकत नाही. (शब्दमर्यादा १८०० शब्द)
(३) या दोन वर्षांत प्राथमिक शिक्षणात ई-लर्निंग आणि सोशल मिडिया (facebook, facebook वरील groups, whatsapp, blogs, websites यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्राथमिक शिक्षकांकडून त्यांचा वापर कसा होतो याची माहिती देणारा एक मोठा लेख या पुस्तकात समाविष्ट करण्यात येईल. हा लेख मीच लिहिणार आहे. संबधित शिक्षकांनी आपल्या उपक्रमांचे टिपण (सुमारे ५०० शब्द) माझ्याकडे कृपया पाठवावे.
(४) अनेक जिल्हा परिषद शाळांनी आयएसओ प्रमाणपत्र मिळवले आहे. ही अतिशय अभिमान वाटण्यासारखी बाब आहे. या पुस्तकात या विषयावरसुद्धा एक लेख मी लिहिणार आहे. त्याचे ५०० शब्दांपर्यंतचे टिपण संबधित शाळांनी कृपया माझ्याकडे पाठवावे.
पुस्तकाचे संपादन निर्दोष व्हावे, निर्मिती उच्च दर्जाची असावी यासाठी लेख पुरेसे अगोदर मिळणे आवश्यक असते. आपले लेख/टिपण कृपया दिनांक ३० एप्रिल २०१५पर्यंत vasant.kalpande@gmail.com वर मेल करावे. लेख युनिकोड किंवा पीडीएफमध्ये किंवा हस्तलिखिताची स्कॅन केलेली प्रत या तीनपैकी कोणत्याही एका स्वरूपात असावे. उपक्रमाशी संबधित छायाचित्रे सोबत पाठवण्यासाठी वेगळे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. मेल करताना आपला मोबाईल नंबर अवश्य द्यावा.
जिल्हा परिषद शाळांचे कार्य सर्व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संबंधितांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने, इतर शिक्षकांमध्येही आणखी उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने हे प्रकाशन अतिशय महत्त्वाचे ठरले होते. त्याची नवीन आवृत्ती हीच भूमिका अधिक प्रभावीपणे बजावू शकेल असे वाटते. ही माहिती विविध मार्गांनी आपल्या सहकाऱ्यांपर्यंतसुद्धा कृपया लवकरात पोचवावी.
हे पुस्तक आपले आहे. ज्या जिव्हाळ्याने पहिल्या आवृत्तीच्या वेळी आपण प्रतिसाद दिला तोच प्रतिसाद यावेळीही द्याल असा मला विश्वास वाटतो. शिक्षण क्षेत्रात गेली ४२ वर्षे काम करणारा एक कार्यकर्ता आणि एका जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळेचा माजी विद्यार्थी या दोन्ही नात्यांनी माझ्या दृष्टीने या पुस्तकाला विशेषच महत्त्व आहे.
डॉ. वसंत काळपांडे
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
मुंबई
No comments:
Post a Comment